कोपरखैरणे स्थानक परिसरात आग

कोपरखैरणे रेल्वे स्थानक इमारत परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारात आग लागल्याची घटना घडली. इमारतीशेजारी असलेल्या लाकडी ओंडक्यांनी पेट घेतल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. पावणे येथील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. रेल्वे रुळांखाली टाकले जाणारे हे सुके ओंडके होते. येथील कचऱ्याला, गवताला आग लागून त्यानंतर हे सुके ओंडके पेटले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांनी आणि प्रवाशांनीच जाऊन रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना या आगीची माहिती दिली. रेल्वे स्थानक व्यवस्थापकांनी तातडीने अग्निशमन केंद्राला खबर दिली. त्यानुसार एमआयडीसी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत भंगारात ठेवलेले ओंडके व स्थानक इमारतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या काही केबल जळल्याने रेल्वे स्थानक इमारतीतील वीजपुरवठा खंडित झाला होता. आग आटोक्यात आल्यावर केबल जोडण्याचे काम त्यानंतर सुरू करण्यात आले. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *