पुणे जिल्ह्यातून संशयित दहशतवाद्याला अटक, एटीएसची कारवाई

देशांतर्गत तसेच पाकिस्तानसह विदेशातील दहशतवादी विचारसरणीच्या संपर्कात असलेल्या एका संशयितास पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात अटक करण्यात आली आहे. हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय-४२) असं या संशयिताचं नाव आहे. तो मूळ पंजाब येथील रोपर जिल्ह्यातला असून सध्या तो कर्नाटकातील बेल्लारी येथे राहायला होता.

स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा तो पुरस्कर्ता आहे. कर्नाटकवरुन पंजाबला ट्रक घेऊन जात असताना दोन डिसेंबर रोजी चाकण परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर गुप्तता पाळण्यात आली आहे. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे आढळली असून न्यायालयाने त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशतवाद्यांची टोळी बनवून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या तयारीत होता. त्यासाठीच हा शस्त्र बाळगून दहशतवादी कृत्याच्या तयारीत होता. हरपालसिंग इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून देशातील तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास भडकावत असे, तसेच शस्त्र जमावण्यास वापर करायचा. इतकंच नव्हे तर तो देशासह पाकिस्तान आणि विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. संशयित व्यक्तीच्या दुसऱ्या सदस्याला पंजाबच्या सरहद पोलीसांनी अटक केली आहे. लवकरच त्यालाही पुढील कारवाईसाठी पुणे एटीएस ताब्यात घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *