शिवरायांबाबत अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम विजयी

महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढल्याने अहमनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला त्याचं पद गमवावं लागलं, तसेच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं. या सगळ्या गोष्टी घडूनही अहमदगनर महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणारा छिंदम विजयी झाला आहे. त्याच्या पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र श्रीपाद छिंदमने या निवडणुकीत यश मिळवले.

पहिल्या काही फेऱ्यांमध्ये श्रीपाद छिंदम पिछाडीवर होता. मात्र नंतर तो आघाडीवर गेला आणि त्याचा विजयही झाला. श्रीपाद छिंदमने अहमदनगरच्या प्रभाग क्रमांक ९ मधून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवली होती आणि विजयी झाला. सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली. तर तेराव्या फेरीपर्यंत त्याने १८५० मतांची आघाडी घेतली.

या प्रभागात छिंदमविरोधात राष्ट्रवादीच्या अनिता राजेंद्र राठोड , शिवसेनेचे सुरेश रतनप्रसाद तिवारी , भाजपाचे प्रदीप परदेशी , मनसेचे पोपट भानुदास पाथरे, अपक्ष प्रवीण शाहूराज जोशी , अपक्ष निलेश सत्यवान म्हसे , अपक्ष अजयकुमार अरुण लयचेट्टी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान छिंदमची पत्नी स्नेहा छिंदमने प्रभाग १३ मधून निवडणूक लढवली. मात्र तिचा पराभव झाला.

काही महिन्यांपूर्वी श्रीपाद छिंदमची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये श्रीपाद छिंदम नगरच्या उपमहापौरपदी असताना ठेकेदाराशी उर्मट भाषेत बोलत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही त्याने अपशब्द काढले. ज्यामुळे भाजपावर टीकेचे ताशेरे झाडण्यात आले. त्यानंतर भाजपाने त्याला पक्षातून घरचा रस्ता दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *