..आणि मारेकरी होते ४५ मिनिटे घरातच

गँगस्टर डी. के. रावचा हस्तक मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (४०) याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजनुसार, मारेकरी ४५ मिनिटे राजा याच्या घरातच होते. त्यानंतर ते बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तींचा यामागे हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायन कोळीवाडा येथील म्हाडा कॉलनीत राजा राहायचा. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास दुचाकीवरून आलेले दोन मारेकरी त्याच्या घरात गेले. त्यानंतर त्याची हत्या करून तब्बल ४५ मिनिटांनी ते बाहेर पडले. निघताना दुचाकी सुरू होत नसल्याने, दुचाकी तेथेच सोडून त्यांनी पळ काढला.

राजाची हत्या झाली तेव्हा तो अंतर्वस्त्रात होता. त्यामुळे यामागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने ते अधिक तपास करत आहेत. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच अभिलेखावरील आरोपींकडेही याबाबत चौकशी सुरू आहे.

राजा सराईत गुन्हेगार…
राजाविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्याने एका पोलीस अधिकाºयाचीही हत्या केली होती. या प्रकरणी मोक्काअंतर्गत राजा अटकेत होता. ३ वर्षांपूर्वी राजाची जामिनावर सुटका झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *