कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील मलंगगड रस्त्यावरील द्वारली गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत हत्तीरोगाची लागण झालेले सहा विद्यार्थी तपासणी पथकाला आढळून आले आहेत. राज्याच्या वैद्यकीय विभागाच्या विशेष तज्ज्ञ पथकाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
ठाणे जिल्ह्य़ात हत्तीरोग संक्रमण पडताळणीचा कार्यक्रम शासनातर्फे सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या तपासणीत सहभागी करून घेण्यात आले आहे. हत्ती रोगाचे विषाणू आढळून आलेल्या विद्यार्थी, व्यक्तींवर तात्काळ उपचार करून त्याला बरे करण्याच्या दृष्टीने शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे, असे तपासणी पथकातील अधिकाऱ्याने सांगितले. हत्तीरोग विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे होतो. या जीवघेण्या आजारावर तात्काळ प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
या रोगाच्या निर्मूलनासाठी बाधिताने वेळीच औषधोपचार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंबीय, वैद्यकीय पथके यांनीही पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगरे यांनी २७ गावातील शाळा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. त्या अद्याप पालिकेकडे वर्ग झाल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांच्या माध्यमातून तेथे वैद्यकीय उपचार झाले पाहिजे, असे उत्तर दिले. द्वारली शाळेतील विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची बाधा झाल्याची माहिती नगरसेवक सुनीता पाटील यांनी दिल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रमुखांना ही माहिती दिली.
द्वारली गावाची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. या भागाचे नागरीकरण होत आहे. स्थलांतरित रहिवासी येथे अधिक संख्येने येत आहेत. लागण झालेले बहुतांशी विद्यार्थी परप्रांतीय आहेत. नवी मुंबईतील वैद्यकीय विभागाचे पथक २७ गावांच्या हद्दीत हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करीत आहे. बाधित सहा विद्यार्थ्यांवर तातडीने औषधोपचार सुरू झाले.
द्वारली गावात हत्तीरोगाची बाधा झालेले विद्यार्थी आढळले आहेत. विशेष वैद्यकीयतज्ज्ञ पथकाला तेथे पाठवून त्या विद्यार्थ्यांना तात्काळ अत्यावश्यक औषधोपचार मिळतील याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. २७ गावांतील हत्तीरोग सर्वेक्षण मोहीम अतिशय काटेकोर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात येतील.
