जम्मू काश्मीरात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये 14 वर्षाच्या मुलाचा समावेश

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जवळपास 18 तास चाललेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं. विशेष म्हणजे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकजण 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता. चकमकीत चार जवान आणि तीन सामान्य नागरिक जखमी झाले आहेत.

तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून मुदसिर रशीद, साकीब मुश्ताक आणि अली भाई अशी त्यांची नावे आहेत. अली भाई हा पाकिस्तानचा नागरिक असल्याचं समजत आहे. मुदसिर रशीद हा फक्त 14 वर्षांचा होता. दरम्यान जखमी झालेल्या लष्कर जवान, दोन पोलीस आणि एका सीआरपीएफ कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी एका घरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष कारवाई पथक, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्त कारवाई करत शनिवारी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. यानंतर चकमकीला सुरुवात आली होती.

दोन दहशतवादी शनिवारी ठार करण्यात आले होते. अंधार झाल्या कारणाने शनिवारी थांबवण्यात आलेली कारवाई रविवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आली. मुदसिर हा नववीत शिकत होता. बंदीपोरा येथील आपल्या घरातून 29 ऑगस्ट रोजी तो बेपत्ता झाला होता. त्याच्यासोबत शाळेतील एक सीनिअर विद्यार्थी बिलाल अहमददेखील होता.

मुदसिरची आई फरिदा बेगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, घर सोडताना मुदसिरने आपण शाळेत जात असल्याचं सांगितलं होतं, पण परतलाच नाही. कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. यानंतर शोध सुरु केला, मात्र मुदसिरचा काहीच पत्ता लागला नाही. 29 नोव्हेंबरला मुदसिरचा हातात एके-47 घेऊन उभा असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुटुंबाला तो जिवंत असल्याचं कळलं.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फरिदा बेगम यांनी मुलाला दहशतवादाचा मार्ग सोडून घरी येण्याची विनंती केली होती. वडील आजारी असल्याने त्याला सुखरुप घरी पाठवा अशी विनंती त्यांनी दहशतवादी संघटनेकडे केली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदसिर याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. मात्र दगडफेक करणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले इतर दहशतवादी काही प्रकरणांमध्ये वॉण्टेड होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *