सांगलीतील शांतिनिकेतनमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थीनीचा वर्ग खोलीतच गळा दाबून, बेंचवर डोके आपटून खून करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. इतर विद्यार्थ्यांनी त्या वर्ग खोलीत प्रवेश करण्यासाठी दरवाजा उघडताच एसवायबीएच्या वर्गात शिकणार्या वैशाली तानाजी नलावडे (वय २१) हिचा मृतदेह पडलेला दिसला. वैशालीचे लग्न झाले असून तिचे सासरचे नाव वैशाली रामदास मुळीक असे आहे. तिला दीड वर्षाचा मुलगाही असल्याची माहिती समोर आली आहे. संशयीत खूनी सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून त्याचे नावही निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील मालेवाडी येथील राहणारी वैशाली नलावडे हिचा विवाह कसबे डिग्रज मधील रामदास मुळीक याच्याशी झाला होता. तिला दीड वर्षाचा मुलगा असून तिने मुक्त विद्यापीठात बीएला नुकताच प्रवेश घेतला होता. रविवारी तिचा खून झाल्याची घटना समोर आली. संशयीत व्यक्ती त्याच केंद्रात प्राध्यपक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. संशयीताचे गावही कसबे डिग्रजच असून त्याने कोणत्या कारणावरुन वैशाली हिचा खून केला असावा, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. पत्नीच्या खूनाची माहिती मिळाल्यानंतर रामदास मुळीक हा शांतिनिकेतन मध्ये धावत आला. त्यानंतर त्याने त्या ठिकाणी हंबरडा फोडला. त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने पोलिसांनी त्याला गावी पाठविले.
वैशाली नलावडे हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. त्यावेळी वैशालीच्या माहेरकडचे नातेवाईक उपस्थित होते. पती मात्र त्या ठिकाणी आला नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयीताने वैशाली हिच्या तोंडावर ओढणी आवळून उर्वरित ओढणीनेच तिचा गळा करकचून आवळला. त्याच स्थितीत तिला जमीनीवर आपटले. या झटापटीत तिच्या डोक्याला पाठीमागे जखम झाली असल्याचेही समोर आले आहे. या घटनेची नोंद संजयनगर पोलिसांत झाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपाधिक्षक अशोक वीरकर, पोलिस निरिक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक काकासाहेब पाटील, उपनिरिक्षक दादासाहेब बुधावले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित पाटील यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित झाला होता. शांतिनिकेतन परिसराला खासगी रखवालदारांचा गराडा असतानाही दिवसाढवळ्या विद्यार्थीनीच्या खूनाची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून अनेकजण रविवारी त्या परिसरात येत असतात. दिवसभर त्या ठिकाणचे वर्ग मुक्तविद्यापीठाच्या स्वाधीन असतात. आकरा वाजता वर्ग सुरु होतात, याची माहिती असल्यानेच संशयीतांने दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास वैशालीचा खून करुन पोबारा केला असल्याची माहिती पुढे आली आहे. पाठीला सॅक लावून वैशालीबरोबर वर्गात आलेला संशयीत परतत असताना अगदी शांतपणे निघून गेल्याचेही समोर आले आहे.
खूनांच्या घटनांत सातत्य
सांगली आणि जिह्याच्या काही भागात सतत खूनाच्या घटना समोर येत आहेत. गुरुवारी दिवसाढवळ्या विश्रामबागमधील अपार्टमेंटमध्ये व्यापार्याच्या खूनाची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी शांतिनिकेतन मध्येही दिवसाढवळ्याच विद्यार्थीनीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
