एकिकडे सोशल मीडियावर कलाविश्वातील लग्नसराईचीच चर्चा होत असताना एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पोस्टने अकेनांचं लक्ष वेधलं आहे. पतीसोबतचा फोटो पोस्ट करणाऱ्या या अभिनेत्रीवरच साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल असं नेमकं झालं तरी काय?
इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करणारी ती अभिनेत्री आहे प्रिया बापट. विविध मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून झळकणाऱ्या प्रियाने एक गोड बातमी सर्वांनाच दिली आहे.
पती उमेश कामत याच्यासोबतचा फोटो शेअर करत तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये, ‘एक गुड न्यूज आहे. #feelingblessed’, असं कॅप्शन लिहिलं आहे. तिची ही पोस्ट पाहता प्रिया गरोदर असून, उमेश आणि तिच्या आयुष्यात लवकरच बाळाच्या रुपात आनंदाचा बहर येणार आहे, असं कळत आहे. तिच्या चेहऱ्यावर असणारी हर्षाची भावना आणि तितकाच आनंदी असा उमेशचा चेहरा पाहून ही जोडी सर्वांच्याच मनात पुन्हा एकदा घर करत आहे.
रियाने सोशल मीडियावर ही पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी तिच्यावर आणि उमेशवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.कोणी हृदयाची चिन्हं वापरत, कोणी पावलांचे ठसे असणारी चिन्हं वापरत या जोडीला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी असणारं नातं जपणाऱ्या प्रियाचा हा अंदाज सर्वांनाच भावला असं म्हणायला हरकत नाही.
