संधी मिळाल्यास एक दिवसाचा पंतप्रधानही होईन- अनिल कपूर

अनिल कपूर यांना ‘नायक’ हा २००१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला होता. यामध्ये अनिल कपूर यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती, ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. आता संधी मिळाल्यास पंतप्रधानही होईन अशी इच्छा अनिल कपूर यांनी ‘इफ्फी’मध्ये बोलून दाखवली. सध्या गोव्यात ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. या महोत्सवातील ‘मास्टर क्लास विथ मि. इंडिया’ या सत्रात अनिल कपूर यांची मुलाखत त्यांचीच मुलगी रिया कपूर हिने घेतली.

या मुलाखतीत अनिल कपूर यांनी सध्याचे चित्रपट, त्यांचे विषय, स्वत:ची कारकीर्द यांबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ‘३ इडियट्ससारख्या चित्रपटातून पालकांनी योग्य तो संदेश घ्यावा. आपल्या मुलांना करिअरमध्ये हवं ते करू द्यावं. याबाबत मी भाषण देणार नाही, कारण मनोरंजन हेच माझं क्षेत्र आहे. भूतानसारख्या देशात सर्वजण आनंदी आहेत. मी नायक चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो. जर मला एक दिवसासाठी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर भारतातील सर्व लोक आनंदी असतील हे पाहिन,’ असं ते म्हणाले.

या मुलाखतीत त्यांनी ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचसोबत वयाच्या साठीतही हॅण्डसम दिसणाऱ्या अनिल कपूर यांनी उपस्थितांना काही टीप्सही दिल्या. स्वत:च्या लूकवर मेहनत घ्या, अन्यथा या इंडस्ट्रीतील लोक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षकही तुम्हाला विसरू शकतात, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *