दोन मैत्रिणींची गळफास घेऊन आत्महत्या

शहरात धक्कादायक घटना घडली. दोन मैत्रिणींनी एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. या आत्महत्यांचं कारण अस्पष्ट असून पोलीस सध्या या घटनेचा तपास करतायत. ऋतुजा साहेबराव कोल्हे (१४) आणि वर्षा चिंतामण पाटील (२७) अशी आत्महत्या केलेल्या दोघींची नावं आहेत.

यापैकी ऋतुजा ही शिकत होती, तर वर्षा घटस्फोटीत असून ती तिच्या वडिलांकडे वास्तव्याला होती. या दोघीही शेजारी शेजारी राहायच्या. दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री असल्यानं त्या दिवसभर एकत्र असायच्या. तसंच रात्रीही त्या बाजूच्या रिकाम्या घरात एकत्रच झोपायच्या. काल रात्री या दोघी आणि ऋतुजाचा १० वर्षांचा भाऊ असे तिघे बाजूच्या घरात झोपले. सकाळी ५ वाजता ऋतुजाच्या भावाला शाळेत जाण्यासाठी आईने उठवलं असता या दोघी बाजूला झोपलेल्या आढळल्या नाहीत. त्यामुळे त्यांना शोधलं असता किचनच्या सिलिंग फॅनच्या हुकला या दोघींनी ओढणीने एकत्रच गळफास घेतल्याचं आढळून आलं.

या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या ऋतुजाच्या आईने आरडाओरडा करताच पाटील कुटुंबीयही धावून आले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. मात्र या दोघींनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल नेमकं काय उचललं, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *