विमानात दहशतवादावरुन जोक पडला महागात! तरुणाला अटक

विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका प्रवाशाला कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली आहे. वेदान पोद्दार असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. जेट एअरवेजच्या विमानाने तो मुंबईला जाणार होता. संशयास्पद वर्तन आणि आक्षेपार्ह कमेंटसह त्याने सेल्फी काढला होता. विमानाचे अपहरण करुन विमान उडवून देण्याबद्दल तो बोलत होता असे सूत्रांनी सांगितले.

वेदान विमानात त्याच्या आसनावर बसल्यानंतर त्याने स्वत:चा चेहरा रुमालाने झाकून घेतला व व्हॉट्स अॅप मेसेज पाठवायला सुरु केले. वेदानच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटले. एका प्रवाशाने त्याचा मोबाइलवरील मेसेज वाचला. त्यामध्ये दहशतवादी विमानात आहे. आज मी मुलींचे ह्दय मोडणार असा संदेश लिहिलेला होता.

त्याच्या संशयास्पद वर्तनानंतर त्याला मुंबईला जाणाऱ्या 9W472 विमानातून खाली उतरवून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. आक्षेपार्ह कमेंटसह तो सेल्फी पाठवत असल्याचे सहप्रवाशांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी ही बाब केबिन क्रू च्या लक्षात आणून दिली. या प्रकरणी चौकशी सुरु आहे असे शिवा मुरुगन यांनी सांगितले.

 सहप्रवाशांनी वेदानचा संवाद ऐकला व लगेच केबिन क्रू ला सर्तक केले. क्रू ने लगेच वैमानिकाला माहिती दिली. वैमानिकाने एटीएसला कळवले. त्यानंतर वेदानला खाली उतरवून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफवर आहे.

वेदान पोद्दार कोलकाता येथील गार्डन लेन भागात राहतो. त्याच्या या कृतीमागचा उद्देश समजून घेण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरील पोलीस चौकीत त्याची कसून चौकशी करण्यात आली. वेदान मुंबईला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाला होता असे चौकशीतून समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *