हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना कन्यारत्न झाले आहे. नेहा आणि अंगदने काही महिन्यांपूर्वी कोणालाही कानोकान खबर न लागता गुपचूप लग्न केले होतं. विशेष म्हणजे लग्नाआधीच गर्भवती असल्याने हा विवाहसोहळा तडकाफडकी करण्याचा निर्णय घेण्यात आला हे नंतर समोर आलं.
खारमधील विमेन्स हॉस्पिटलमध्ये आज रविवारी सकाळी ११ वाजता या चिमुकलीचा जन्म झाला असून या चिमुकलीच्या आगमनामुळे सध्या अंगद आणि नेहाच्या घरी आनंदाचं वातावरण पसरलं आहे. इतकंच नाही तर घरी या नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारीदेखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने तिच्या प्रेग्नसीबाबत एक खुलासा केला. गर्भवती असल्याची गोष्ट सहाव्या महिन्यापर्यंत मी लपवून ठेवली होती. कदाचित मी गर्भवती असल्याचं समजताच मला कोणीही काम देणार नाही माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सारखी वाटायची म्हणूनच मी बातमी लपवून ठेवली होती असं तिनं कबुल केलं.
