बायकोने मटण बनवायला उशीर केला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने पोटच्या चार वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील फकीरटोली गावात बुधवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. बिहारची राजधानी पाटण्यापासून ३६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
शंभू लाल शर्मा (४०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णिया येथील सादर हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. चौकशीमध्ये आरोपीने त्याच्या हातून घडलेल्या या अमानवीय कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. आरोपी शंभू लाल गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करतो. छट पूजेसाठी म्हणून तो गावी आला होता. त्याला मटण प्रचंड आवडते.
मटण बनवायला उशिर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने त्याच्याजवळ खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण सुरु केली. मुलीचा आवाज येणे बंद झाल्यानंतर त्याने मारहाण थांबवली. आपल्या कृत्यामुळे मुलगी बेशुद्ध पडल्याचे त्याच्या लक्षात आले.
