‘लिव्ह इन’पार्टनरच्या मुलीसोबतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियकराने 10 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची ही घटना आहे. मंगळवारी गाझियाबाद येथून या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली.
सोमवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. घटना घडली त्यावेळी 10 वर्षाच्या चिमुकलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती आणि चिमुकली घरी एकटीच होती. रात्री उशीरा चिमुकलीच्या आईचा लिव्ह इन पार्टनर घरी आला आणि त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर आई घरी परतल्यावर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. घडलेला प्रकार ऐकून धक्का बसलेल्या तिच्या आईने आरोपी प्रियकराविरोधात गाजियाबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी पूरण याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी श्लोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्कार केला त्यावेळी आरोपी हा नशेत होता. दारुच्या नशेत घरी आल्यानंतर त्याने हे कृत्य केलं. पीडित मुलीच्या वडिलांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिची आई आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. आरोपीविरोधात आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
