लातूरमध्ये गतिमंद मुलीवर परप्रांतीयाचा बलात्कार

गुजरातमध्ये १४ महिन्यांच्या एका चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर उत्तर भारतीयांविरुद्ध हिंसा उसळली असतानाच लातूरमध्ये एका गतिमंद मुलीवर परप्रांतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

लातूरमधील शिरुरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा या ठिकाणी गतिमंद मुलीवर परप्रांतीय व्यक्तीनं बलात्कार केला. आरोपी महंमद कुरेशी (वय २४) ला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. तो या ठिकाणी मिक्सर विकण्याचं काम करतो. महंमद कुरेशी मिक्सर विकण्यासाठी शिराळा वांजरवाडा वस्तीवर आला होता. घरात मुलगी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत त्यानं पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. घरात कोणी नाही हे पाहून त्यानं घरात एकट्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. मुलीने हा सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.

पालकाने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी थोडाही वेळ न दवडता लगेच सूत्रे हलवली. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात आले. आरोपीला पीडित मुलीसमोर आणल्यानंतर तिनं आरोपीला ओळखले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी महंमद कुरेशीला तासाभरातच अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *