दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे सोमवारी निधन झालं. कृष्णा यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी कपूर निवासस्थानाकडे धाव घेतली. या कलाकारमंडळींमध्ये राणी मुखर्जी आणि करण जोहर हेदेखील होते. परंतु या दु:खद प्रसंगी या दोघांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे.
कृष्णा यांचं निधन झाल्यामुळे संपूर्ण कपूर कुटूंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे या कुटूंबाचं सांत्वन करण्यासाठी आलिया भटसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक करण जोहरदेखील आले होते. विशेष म्हणजे या दु:खद प्रसंगी हे दोघे हसताना दिसून आले. त्यांच्या याच वागण्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना खडे बोलही सुनावले आहेत.
दरम्यान, सध्या या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी या दोघांना वागण्याची पद्धत नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी दु:खद प्रसंगी कसं वागावं हे देखील कळत नाही का असा जाब विचारला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये या दोघांसोबत आलिया भटदेखील दिसत असून तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसून येत आहे.
