तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त झालेल्या वडिलांनी पोटच्या मुलीवर आणि जावयावर क्रूर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करुन त्यांनी मुलीचे हात तोडले. मुलीची प्रकृती गंभीर असून जावई सुद्धा या हल्ल्यात जखमी झाला आहे.
बुधवारी दुपारी हैदराबादच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली. बंजारा हिल्स पोलिसांनी आरोपी मनोहर चारी (४२) याला त्याच दिवशी संध्याकाळी अटक केली. मुलगी माधवी चारीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बी. संदीप (२२) बरोबर लग्न केले. संदीप दलित असल्याने मनोहर चारी यांना हे लग्न मान्य नव्हते. त्याच रागातून त्यांनी या नवविवाहित जोडप्यावर हल्ला केला.
संदीप आणि माधवीमध्ये मागच्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मनोहर चारी यांचा विरोध असतानाही माधवी आणि संदीपने १२ सप्टेंबरला गपचुपपणे कोणाला काही कळू न देता बोलारम येथे लग्न केले. बुधवारी दुपारी मनोहर यांनी मुलीला फोन करुन आपल्याला तुमचा विवाहाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. त्यांनी मुलीला समेटासाठी नवऱ्याला सोबत घेऊन येण्यास सांगितले.
माधवीचा देखील वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसला व ती नवऱ्यासोबत गोकुळ थिएटर येथे पोहोचली. दोघा नवरा-बायकोंनी त्यांची स्कूटर पार्क केली व ते वडिलांच्या येण्याची वाट पाहत होते. दुपारी ३.१५ च्या सुमारास मनोहर तिथे बाईकवरुन पोहोचला. बाईकवरुन उतरताच त्याने जवळ असलेला कोयता बाहेर काढला व संदीपवर वार केला. संदीपने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तिथून पळ काढला.
त्यानंतर मनोहरने कोयत्याने वार करुन मुलीचे हात तोडले. पोटची मुलगी गयावया करुन हातापाया पडत होती. पण निर्दयी पिता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मनोहर पुन्हा माधवीवर वार करणार इतक्यात एका व्यक्तीने लाथ मारुन त्याल दूर ढकलले. आसपास जमलेला जमाव पाहून मनोहरने तिथून पळ काढला. मनोहर चारी एका सोनराच्या दुकानात नोकरीला होता. संदीपचे वडिल नसून तो सध्या शिक्षण घेत आहे.