काश्मीरमधील बारामुल्ला येथील नऊ वर्षांच्या मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुलीच्या सावत्र आईनेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. मुलीच्या सावत्र भावासह तीन जणांनी त्या मुलीवर बलात्कार केला आणि यानंतर तिची निर्घृण हत्या केली. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी नराधमांनी मृतदेहावर अॅसिड टाकले.
बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार जंगलात नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत नऊ जणांना अटक केली. यात मुलीच्या सावत्र आई आणि सावत्र भावाचा देखील समावेश आहे.
पोलीस अधीक्षक इम्तियाज हुसैन म्हणाले, मुलीच्या वडिलांचा आम्ही जबाब घेतला. त्यांच्या दोन पत्नी आहेत. यातील एक पत्नी ही मूळची झारखंडची आहे. तर दुसरी स्थानिक आहे. यातील एकीला पतीच्या दुसऱ्या पत्नीचा राग यायचा. पती तिचे ऐकतो, तिच्या घरी जास्त राहतो म्हणून तिला राग यायचा. यातूनच तिने नऊ वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या करण्याचा कट आखला.
२४ ऑगस्ट रोजी महिला सावत्र मुलीला घेऊन जंगलाच्या दिशेने गेली. वाटेत काही वेळाने तिचा १४ वर्षांचा मुलगाही तिला भेटला. त्याच्यासोबत दोन मित्र होते. यानंतर त्यांना नासीर अहमद (वय २८) हा देखील भेटला. सर्व जण मुलीला घेऊन जंगलात गेले. तिथे सावत्र आईच्या डोळ्यादेखतच तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिचे डोळे देखील काढण्यात आले. यानंतर तिच्या अंगावर अॅसिड टाकण्यात आले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले चाकू जप्त केले आहे.
