पावसामुळे केरळमध्ये परिस्थिती गंभीर, ६७ जणांचा मृत्यू

केरळमध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली असून अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. केरळमध्ये मृतांचा आकडा वाढून ६७ झाला आहे. आज बुधवारी एकाच दिवशी २५ जणांचा मृत्यू झाला. केरळच्या १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कराने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

मुसळधार पावसामुळे केरळच्या इतिहासात प्रथमच ३९ पैकी ३५ धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. पूरामुळे कोची विमानतळ शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. एर्नाकुलमच्या एचआयएल कॉलनीत अडकलेल्या २३ जणांची १३ गरवाल रायफलच्या जवानांनी सुटका केली.

संपूर्ण राज्यात बचाव मोहिम सुरु असून लोकांना मदत छावण्यांमध्ये पोहोचवले जात आहे. मंजुमाला, कुमीली, पेरीयार आणि अय्यापानकोविल या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सरकारने एर्नाकुलममधील पेरीयार नदी, इडुक्की आणि थ्रिसूर येथे राहणाऱ्या लोकांना मदत छावण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.

पावसामुळे आतापर्यंत येथे ४५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथील वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण जीवन कोलमडून गेले आहे. कोची विमानतळालगत असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून आज दुपारी २ वाजेपर्यंत एकही विमान उड्डाण करणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा चालु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन प्रशासनाने सांगितले होते. पण पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे आणि पाण्याचा निसरा न झाल्याने येथील विमानतळ प्रशासनाने शनिवारपर्यंत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *