मराठा आरक्षणाच्या कारणावरून शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. लातूर तालुक्यातील माटेफळ येथे बुधवारी ही घटना घडली. रमेश ज्ञानोबा पाटील असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज बांधवांनी मुरुड येथे रास्ता रोको आंदोलन केले. पाटील यांच्या मुलांना नोकरी लागत नसल्याने ते व्यथित होते. यामुळे आरक्षणाच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आरक्षणाच्या या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यावेळी मुरुड येथील रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी गर्दी केली होती. अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.