..आणि अतिदक्षता विभागातच दोघांचे शुभमंगल सावधान!

घरातील मंडळींनी विवाहाला विरोध केल्याने आत्महत्या करण्याचा निर्धार करून प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने वाचलेल्या या युगुलाला पुढे काय होईल या चिंतेने ग्रासले होते. मात्र त्यांना सुखद धक्काच बसला. या युगुलाच्या कुटुंबीयांनी अतिदक्षता विभागामध्येच त्यांचा विवाह लावून दिला. हरयाणातील हिसारमध्ये ही घटना घडली आहे.

गुरमुखसिंग आणि कुसुम असे युगुलाचे नाव आहे. गुरमुख हा पिरावाली गवात राहतो तर कुसुम विद्युतनगरमध्ये राहते. दोघांनीही हिसारच्या जीएन महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. महाविद्यालयातच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र दोघांच्याही कुटुंबीयांनी विवाहाला विरोध केला. त्यामुळे दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

विष प्राशन केल्यानंतर गुरमुखने मोठय़ा भावाला दूरध्वनी करून ही माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने पावले उचलून दोघांनाही अतिदक्षता विभागात दाखल केले. घडलेला प्रकार कळताच मुलीच्या घरच्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी शांतपणे विचार करून दोघांच्या भल्यासाठी त्यांचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. दोघेही शुद्धीवर येताच अतिदक्षता विभागातच त्यांचा विवाह लावून देण्यात आला. या वेळी रुग्णालयातील कर्मचारीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *