मुलीची छेड काढणाऱ्याला पकडण्यासाठी वडिलांनी रचला सापळा

मुंबईत साकिनाका पोलिसांनी उत्तर प्रदेशमधल्या 31 वर्षांच्या तरूणाला अटक केली आहे. मुंबईतल्या 22 वर्षांच्या एका तरूणीला तो त्रास देत होता. कृष्णा बघेल असं आरोपीचं नाव असून त्यानं या मुलीचे फोटो मॉर्फ केलेली नग्न छायाचित्रं सोशल मीडियावर अपलोड केली होती. त्याचा विवाहाचा प्रस्ताव मुलीनं फेटाळल्यानं तो तिला त्रास देत होता. मुलीला त्रास देणाऱ्या या भामट्याला पकडण्यासाठी तिच्या वडिलांनी सापळा रचला आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना मदत केली.

बघेलनं या मुलीशी सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली होती. आपण कलाकार असून आग्रा येथे राहतो आणि व्हिडीयो एडिटर असल्याचे त्याने सांगितलं होतं. नंतर त्यानं या मुलीला लग्नाची मागणी घातली, जी तिनं नाकारली. त्यानंतर त्याचं वागणं बिघडत गेलं. बघेलनं नंतर एका भलत्याच मुलीच्या नग्न छायाचित्राला या मुलीचा चेहरा चिकटवला आणि तो सोशल मीडियावर पसरवला. त्यामुळे या मुलीनं पोलिस तक्रार केली. बघेलनं या मुलीला अनेकवेळा धमकावलं देखील.

नंतर मग पोलिसांनी व या मुलीच्या वडिलांनी मिळून सापळा रचला. वडिलांनी बघेलशी संपर्क साधला आणि आपण चित्रपट निर्माते असल्याचे सांगितले. तसेच आपण मै हू ऑटोवाला हा चित्रपट बनवत असून त्यात मुख्य कलाकाराची ऑफर देत असल्याचे बघेलला त्यांनी सांगितले.

खूश झालेल्या बघेलनं लागलीच फेसबुकवर आपल्याला चित्रपटाची ऑफर आल्याचे व आपण मुंबईला जात असल्याचे सांगितले. 26 जुलै रोजी बघेल मुंबईला आल्या आल्या पोलिसांनी त्याला अटक केली. महिलेला त्रास देणं, धमकी देणं याबरोबरच आयटी अॅक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *