हिमाचल प्रदेशमधील मंडी शहरात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास घडली. आगीत अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
या स्फोटामुळे बाजूच्या परिसरातील इमारतींनाही हादरे बसले असून खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता मंडीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव कुमार यांनी वर्तवली आहे. मंडीतील नेर चौकात ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी प्रशासनानेही धाव घेतली आहे.
दरम्यान, मंडी येथील भराडू ग्रामपंचायत परिसरात शनिवारी रात्री लागलेल्या आगीत ३ गोशाळा जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत काही गुराख्यांचाही होरपळून मृत्यू झाला होता. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.