बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे केली. यंदा प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिमूर्ती ठेवून महापूजा करण्यात आली.

मराठा समाजाच्या तीव्र आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेला जाण्याचे टाळले. तसेच पंढरपूरात दाखल झालेल्या 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा करणार नाही. मात्र, 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा प्रतिनिधी आणि विठ्ठलाचा सेवक म्हणून मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्नीक विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे फडणवीस यांनी रविवारीच सांगितले होते. त्यानंतर, आज पहाटे पंढरपूरातील विठ्ठलपूजेला सुरुवात होताच, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनीही विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्राच्या यशाची पताका फडकू दे असे साकडेही विठ्ठलाला घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *