सोळा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

एका सोळा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खारच्या ५३ वर्षीय व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी ही कारवाई केली.
खारमधील एका उच्चभ्रू वसाहतीत १६ वर्षीय मुलगा आईसोबत राहतो. त्याची आई व्यवसायाने उद्योजिका आहे. त्या कामानिमित्त घराबाहेर असल्याने तो एकटाच घरी राहत होता. याच दरम्यान समलैंगिक संबंधाचा प्रसार करणाऱ्या संकेतस्थळाबाबत त्याला आकर्षण निर्माण झाले. त्यापैकी एका संकेतस्थळावर त्याने संवाद करण्यास सुरुवात केली. सावज जाळ्यात अडकल्यानंतर संकेतस्थळावर ओळख झालेल्या व्यक्ती घरी येऊ लागल्या.
६ जून रोजी अचानक घरी धडकलेल्या आईच्या निदर्शनास हा प्रकार आला. आईने विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर त्याला सारा प्रकार कथन केला. त्या व्यक्तीने त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्याचे समजताच, आईलाही धक्का बसला. तिने थेट खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
पुढे तपासात, खारच्या ५३ वर्षीय व्यावसायिकाचा सहभागही उघड झाला. सोमवारी रात्री उशिराने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे खार पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुलाच्या अज्ञानाचा फायदा घेत, त्याच्यावर आणखी काही व्यावसायिक, प्रतिष्ठित व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *