सुनेला जाळणा-या सासूला आजन्म कारावास

सुनेला रॉकेल ओतून जिवंत जाळणाºया सासूला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंप्री येथे २०१३ मध्ये ही घटना घडली होती.
विधी सूत्रानुसार, सोनू संदीप लसन्ते (२०) असे मृताचे नाव आहे. घटनेच्या  दीड वर्षांपूर्वी सोनूचे संदीपसोबत लग्न झाले होते. प्रारंभी दोन खोल्यांच्या छोटेखानी घरात नवरा संदीप, सासरा हरिभाऊ व सासू कमलाबाई यांच्यासोबत राहत होती. मात्र, सासूसोबत होणाºया कुरबुरींमुळे सोनूने पतीसोबत त्याच घरात वेगळा संसार थाटला होता. ती माहेरी गेल्यानंतर केवळ सासूचाच त्रास असल्याचे सांगायची. २४ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ८ वाजता ती चुलीवर स्वयंपाक करीत असताना सासू कमलाबाईने मागून येऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आगपेटी लावली. सोनूने अंगणातील टाक्यात स्वत: झोकून देऊन आग विझविली. मात्र, त्यापूर्वी ती पूर्णपणे भाजली होती.  सोनूला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्यकारी दंडाधिकारी रवि महल्ले यांनी डॉ. अभिषेक नायडू यांच्या उपस्थितीत तिचे मृत्युपूर्व बयाण नोंदविले. रात्री ११.४५ वाजता तिचा मृत्यू झाला. मृत्युपूर्व बयाणावरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी कलमाबाई हरिभाऊ लसन्ते (६०) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग तायडे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांच्या न्यायासनापुढे चाललेल्या खटल्यात सरकारी अभियोक्ता दीपक आंबलकर यांनी सहा साक्षीदार तपासले.  त्यापैकी सुदाम डुकरे हा फितुर झाला. तथापि, मृत सोनूची आई अंतकला आनंदा राऊत, डॉ. अभिषेक नायडू व कार्यकारी दंडाधिकारी महाले यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. न्यायालयाने या प्रकरणी आरोपी कमलाबाईला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *