डोक्यावर हातोडीने प्रहार करुन पत्नीची हत्या, मेव्हणीला ऑडिओ क्लिप पाठवून दिली कबुली

चारित्र्यावर संशय घेऊन एका तरुणाने पत्नीच्या डोक्यावर हातोडीने प्रहार करुन तिची हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. अजित पुजारी (वय ३०) असे या आरोपीचे नाव असून हत्येनंतर त्याने गुन्ह्याची कबुली देतानाची ऑडिओ क्लिप मेव्हणीला पाठवली आणि ही घटना उघड झाली. अजितनेदेखील आत्महत्या केली आहे.

अजित पुजारीचे २०१० मध्ये प्रियंकाशी लग्न झाले होते. हे दाम्पत्य शिळ डायघर परिसरातील साजसृष्टी इमारतीमध्ये राहत होते. अजित प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून मंगळवारी रात्री त्याने प्रियंकाच्या डोक्यावर हातोडीने प्रहार करुन तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने मेव्हणीला एक ऑडिओ क्लिप पाठवली. यात त्याने हत्येची कबुली दिली होती. ही क्लिप ऐकताच बुधवारी सकाळी प्रियंकाच्या नातेवाईकांनी डायघरमधील घराकडे धाव घेतली.  पत्नीची हत्या केल्यानंतर अजितने गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘प्रियंकाचे अनैतिक संबंध होते. यातूनच मी तिची हत्या केली. चुलत भाऊ रमेशमुळे मला टोकाचे पाऊल उचलावे लागले’, असे अजितने क्लिपमध्ये म्हटले आहे. पुजारी हा महापेतील खासगी कंपनीत कामाला होता. तर प्रियंका ही ब्यूटी पार्लरमध्ये कामाला होती. अजितने काही दिवसांपूर्वीच कंपनीतून राजीनामा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी अजितविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रियंकाच्या कुटुंबियांनी अजितचा दावा फेटाळून लावला आहे. अजितला दारुचे व्यसन होते आणि तो प्रियंकावर संशय घ्यायचा, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *