बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत झाली नायब तहसीलदार

राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे गेल्या दोन वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार अमित ठाकरे यांनी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडला होता. या चर्चेनंतर अखेर शनिवारी प्राजक्ताला तिची नायब तहसिलदारपदी नियुक्ती करत असल्याचे पत्र देण्यात आले.

प्राजक्ता सावंत  ही २०१० आणि २०११ मधील राष्ट्रीय बॅडमिंटन विजेती आहे. तिने २००४ ते २०१४ या कालावाधीमध्ये भारताचे नेतृत्व करत सात पदके कमावली आहेत. मे २०११मधील निर्णयानुसार प्राजक्ताने अर्ज दाखल केला होता. मात्र तेव्हा ती बारावी उत्तीर्ण असल्याने तिला ‘क’ दर्जाचे पद देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर तिने पदवी प्राप्त केली. तिला नायब तहसीलदार पद देण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. २०१६ साली ती ‘अ’ दर्जाच्या पदासाठी न्यायालयात गेली. मात्र तिच्या कामगिरीनुसार नायब तहसीलदार पद देण्यात येईल, हे स्पष्ट झाल्यानंतरही हा विषय प्रलंबित होता. त्यासाठी तिने अमित ठाकरेंची भेट घेतली. विनोद तावडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर शुक्रवारी तिच्या हातात नियुक्तीपत्र पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *