पिंपरी-चिंचवड : त्यांचे शिक्षण अवघे पाचवीपर्यंतचे…याच शिक्षणामुळे एक कटू अनुभव आला त्यातून अवलीयाने शाळा उभा केली…अवघ्या १४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या मराठी शाळेत आता मात्र तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अवलीयाचे नाव आहे अण्णासाहेब जाधव… आणि त्यांचं वय आहे अवघं ८४…या वयातही ते जवळपास रोजच शाळेत ठाण मांडून असतात. अण्णांचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झाले असले तरीही त्यांनी हातात घेतलेला शिक्षणाचा वसा मोठ्या अधिकाऱ्यांनाही लाजवेल असाच आहे.
अण्णासाहेबांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बॉईज आर्मी मध्ये नोकरी सुरु केली. तिथे त्यांनी तीन वर्षे नोकरी केली,त्यानंतर ते एस.आर.पी, पोलीस, एयरफोर्स अशा ठिकाणी शासकीय नोकरी केली. हा प्रवास सुरु असताना पुण्यात यायचं या ध्येयाने त्यांनी एका नामांकित कंपनीत काम सुरू केले. हे सगळे करत असताना त्यांनी इंडस्ट्रीयल कुस्तीमध्ये सलग चार वर्षे चॅम्पियनशिपचा ‘किताब जिंकून दाखवला. त्याच कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांना सगळे ओळखू लागले. यावेळी १२ वी पास असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आपला अनुभव जास्त असूनही बढती देण्यात आली. ही सल पुढचा बराच काळ मनात राहीली. त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व खऱ्या अर्थाने लक्षात आल्याचे ते सांगतात. तेव्हा आपण शिक्षण घेतलं नसलं तरी गरीब आणि होतकरू मुलांना शिक्षण द्यायचा पण त्यांनी यावेळी केला. याच जिद्दीने श्री शिव छत्रपती शिवाजीराजे विद्यालयाचा जन्म झाला.
