‘ते माझे ठुमकेच बघत असतील’, भाजपा खासदाराला सपना चौधरीचं प्रत्युत्तर

हरयाणा येथील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीला ठुमकेवाली म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला स्वतः सपना चौधरीने सडेतोड उत्तर दिलं आहे. ते माझे ठुमकेच बघत असतील, म्हणून त्यांनी असं विधान केलं, असा पलटवार सपना चौधरीने भाजपा खासदारावर केला. भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला होता.

सपना चौधरी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मी काँग्रेसचा प्रचार करू इच्छिते असं विधान सपना चौधरीने केलं होतं. याबाबत भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला. काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे? मला असे वाटते काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे अशीही टीका चोप्रा यांनी केली होती.

चोप्रा यांच्या या विधानाचा समाचार घेताना सपना चौधरी म्हणाल्या, ‘ते माझे ठुमकेच बघत असतील,म्हणून त्यांनी असं विधान केलं. मी खरंतर त्यांचे आभार मानते, कौतुक केल्याबद्दल आभारी. कोणाबद्दल काही माहित नसताना त्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला नसतो’, अशा शब्दात सपना चौधरी यांनी भाजपा खासदाराला फटकारलं.

सपना चौधरी या राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी त्या काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यानंतर १० जनपथ येथे जाऊन त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी देशासाठी खूप चांगले काम केले आहे. त्यामुळेच मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे, यामध्ये माझा राजकारण प्रवेश वगैरे करण्याचा विचार नाही. प्रत्येकाच्या आयु्ष्यात एक चांगला काळ येतो. तो काळ आपण आनंदातच जगला पाहिजे असे मत चौधरी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *