महाराष्ट्रात आता प्लास्टिक बंदी मात्र ही बंदी नेमकी कोणत्या प्लास्टिक उत्पादनांवर आणि कोणत्या उत्पादनांना बंदीतून वगळले आहे त्याची माहिती असणे आवश्यकच. अनेकांना वाटते आपल्याकडे असली एखादी प्लास्टिक पिशवी, वापरला एखादा चमचा तर काय बिघडते…मात्र तसे नाही यावेळी प्लास्टिकबंदीचे स्वरुप खूपच कठोर आहे आणि ही बंदी सर्वांसाठीच, सर्वच ठिकाणी लागू आहे. अपवाद आहे तो फक्त मोजक्या ठिकाणांचा तोही कडक अटींसह.
सर्वप्रथम प्लास्टिक बंदी नेमकी कोणत्या उत्पादनांवर ते समजून घेणे आवश्यक आहे.
हे प्लास्टिक उत्पादने वापरुच नका:
⦁ हॅंडल असलेल्या किंवा नसलेल्या प्लास्टिक पिशव्या
⦁ प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेले वापरुन फेकायची म्हणजेच डिस्पोजेबल उत्पादने. डिश, कप, प्लेट, ग्लास, काटे, टमचे, वाडगा, डबे
⦁ हॉटेलमध्ये अन्नपदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या डिस्पोजेबल डिश, वाडगे, चमचे, स्ट्रॉ, नॉन-वुवन पॉलिप्रोलिन पिशव्या, द्रवपदार्थांसाठीचे कप, पाऊचेस
⦁ उत्पादने साठवण्यासाठी, गुंडाळण्यासाठीची प्लास्टिक आच्छादने
⦁ अन्नपदार्थ, अन्नधान्य गुंडाळण्यासाठीची प्लास्टिक आच्छादने
कठोर अशा प्लास्टिकबंदीतून काही उत्पादनांना, ठिकाणांना सुटही आहे, ती कोणती ते जाणून घेऊया.
प्लास्टिक बंदीत नेमके काय नाही?
⦁ औषधी उत्पादने ठेवण्यासाठी वापरलेले प्लास्टिक किंवा प्लास्टिक पिशव्या.
⦁ विघटनशील प्लास्टिक पिशव्या किंवा साहित्य, ज्यांचा वापर रोपांची नर्सरी, फळझाडे, शेती, घनकचरा वाहतुकीसाठीचा वापर यांच्यावर बंदी नाही, मात्र त्या प्लास्टिक साहित्यावर “फक्त या खास वापरासाठीच” असे ठळकपणे नमूद करणे आवश्यक असेल.
⦁ उत्पादनाच्या पातळीवर उत्पादनांचा अविभाज्य घटक असलेले साहित्य गुंडाळण्याठी वापरलेले प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या पिशव्या. मात्र त्यांचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना वरच्या आच्छादनावर आणि उत्पादनावर ठळकपणे नमूद करणे आवश्यक असेल.
⦁ दुधाच्या पॅकिंगसाठी फुडग्रेडच्या वर्जिन प्लास्टिक पिशव्या ज्यांची जाडी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त असेल त्या प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी नाही.
अनेकांचा असा गैरसमज असतो की प्लास्टिक बंदी ही आपल्यावर नाही तर दुकानदार, कंपन्या यांच्यावरच. मात्र, तसे नाही, कारवाई एखादी पिशवी वापरण्यांवरही होऊ शकत, त्यामुळे
प्लास्टिक बंदी नेमकी कोणावर?
⦁ सर्वच नागरिक
⦁ सरकारी, गैरसरकारी संघटना
⦁ शैक्षणिक संस्था
⦁ क्रीडा संकुले
⦁ क्लब्स
⦁ चित्रपटगृहे
⦁ लग्नसोहळ्यांचे हॉल
⦁ औद्योगिक युनिट
⦁ व्यावसायिक संस्था
⦁ कार्यालये
⦁ तीर्थयात्रा आयोजक, यात्रेकरु, धार्मिक ठिकाणे
⦁ महाराष्ट्र राज्यातील सर्व हॉटेल, पर्यटन स्थळे, दुकाने, मॉल वगैरे सर्वच ठिकाणे
प्लास्टिक पिशवी, उत्पादने वापरली तर काय शिक्षा?
⦁ बंदी असलेले प्लास्टिक वापरण्याला पहिल्यांदा ५ हजार,
⦁ दुसऱ्यांदा १० हजाराचा दंड.
⦁ तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार दंड आणि तीन महिन्यांपर्यंत शिक्षेची शक्यता
कायद्याने बंदी आणली आहे म्हणून केवळ नाही तर प्लास्टिकबंदी आपल्या सर्वांच्याच फायद्याची असल्याने आपण ती पाळलीच पाहिजे. प्लास्टिकचा भस्मासूर एवढा माजलाय की आपल्याच अस्तित्वार तो घाला घालू पाहतोय, त्यामुळे सावध व्हा. प्लास्टिकला बोला नाही, आणि जीवनावर करा प्रेम! प्लास्टिक बंदीने त्रास थोडा, फायदा मोठा!