दररोज प्लास्टिकबद्दल होणाऱ्या चर्चेमुळे काही गृहिणींनी कापडी पिशव्या वापरायला सुरुवात केली तरी अजूनही भाजी मार्केटमध्ये भाजीवाले त्यांचे सामान आणायला आणि ग्राहकांना सामान देण्यासाठी पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. या पिशव्या सध्या दर्शनी भागात दिसत नाहीत. मात्र कापडी पिशवी नाही, असे सांगितल्यावर टोपलीखालून प्लास्टिकची पिशवी काढून दिली जाते. ग्राहकांनाही मार्केटमध्ये किंवा दुकानात पिशवी मिळणारच ही खात्री असल्याने तेही फारसा विचार करताना दिसत नाहीत.
काही ठिकाणी दुधाच्या डेअरींमध्ये दही, दुधासाठी डबे किंवा किटल्या आणा, असे सांगायला सुरुवात झाली आहे. याचे प्रमाण अगदीच हातावर मोजण्याइतके आहे. मासळी बाजारामध्येही काही नागरिकांनी डबे न्यायला सुरुवात केली आहे. मासे खाकी रंगाच्या पिशव्यांमधूनही देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या कागदी पिशव्या ओल्या होऊन कागद माशांना चिकटून बसण्याची शक्यताही अधिक आहे. त्यात पावसात या कागदी पिशव्यांची काळजी कशी घ्यायची, असाही प्रश्न विचारला जात आहे. प्लास्टिकला भरभक्कम पर्याय न मिळाल्याने ही बंदी यशस्वी कशी ठरणार, अशीही शंका निर्माण झाली आहे.