कोचिंग क्लासेस ची लाखो रुपयांची लूट

कोचिंग क्लासेस ची लाखो रुपयांची लूट

राज्यात सर्वत्र खासगी क्लासचे पेव फुटले आहे. अनेक क्लासेसचे संचालक व शिक्षण विभागातील संबंधित अधिका-यांशी संगनमत करून पालकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिकाधिक गुणांचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपयांची लूट सुरू आहे.

त्यामुळे खासगी क्लासेसवर अंकुश ठेवण्यासाठी नवा कायदा करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. खासगी क्लासेसच्या लाखो रुपयांच्या वृत्तपत्रांतील जाहिरातींवर बंदी आणण्याची मागणी विरोधकांनी केली.

मुंबईसह राज्यात अनेक क्लासेस ‘आमच्या क्लासला प्रवेश घ्या, परीक्षेत १०० टक्के गुण मिळवा’ आदी फसव्या जाहिराती देऊन पालकांकडून अवाच्या सव्वा फी आकारत आहेत.

अत्यंत अरुंद जागेत मोठया संख्येने विद्यार्थी बसवणे, शाळा व कॉलेजमधील अधिका-यांसोबत संगनमत करून पालकांची लूट करणे आदी महत्त्वाच्या बाबींकडे नियम १०५ अन्वये विधानसभा सदस्य सरदार तारासिंह, शरद सोनावणे, अमित साटम, सुनील राऊत यांनी लक्षवेधी सूचना दिल्या. त्यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

काही क्लासेस साधारण एक ते दीड लाखांपर्यंत फी आकारत कोंबडय़ांच्या खुराडयाप्रमाणे विद्यार्थी भरतात. विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देत नसतात. साधे शौचालयही क्लासेसमध्ये नसते. या क्लासेसवर लगाम घालण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रथम सीईटीसारख्या परीक्षांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

हे क्लासेस कोटय़वधी रुपयांच्या वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर जाहिराती देतात. याचाच अर्थ कोटय़वधी रुपयांची उलाढाल हे क्लास करीत असतात. केवळ अर्थप्राप्ती हेच या क्लासेसचे ध्येय दिसते. तेव्हा प्रथम अशा कोटय़वधी रुपयांच्या जाहिराती देण्यास बंदी आणण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. नवा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मांडावा, असे मनसेचे सदस्य शरद सोनावणे यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, यापूर्वी अशा खासगी क्लासेसवर अंकुश ठेवणारा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला होता. खासगी क्लासेसची मनमानी रोखण्यासाठी आणि राज्याचा त्यावर अंकुश ठेवण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा झाल्यानंतर नवा कायदा करणे शक्य आहे. या कायद्यानुसार कोचिंग क्लासेसवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

प्रत्येक क्लासची नोंदणी करण्यात येईल. तसेच क्लासेसला विद्यार्थी व पालकांनी पडू नये म्हणून सीईटीसारख्या परीक्षा बंद करणे किंवा त्यात फेरबदल करण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली आहे.

मात्र राज्यात खासगी कोचिंग क्लासेसचे मोठे जाळे असून ही मंडळी न्यायालयात धाव घेतल्यास तावडे कोणती भूमिका घेणार यावरच सर्व अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *