लॉटरी लागली, पण…

टेम्पो चालवूनही कुटुंबाचा घर खर्च भागत नसल्याने लॉटरीचे तिकीट खरेदी करून नशीब अजमावून पाहू, या इराद्याने त्यांनी तिकीट खरेदी केले. एक कोटी ११ लाखा रुपयांची लॉटरी लागल्याने त्यांना सुखद धक्काही बसला, पण तीन महिने झाले तरी त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी अखेर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुहास कदम (रा. नालासोपारा) हे टेम्पोने भाजी घेऊन कल्याण येथील बाजारात येतात. १६ मार्चला नशीब आजमावण्यासाठी त्यांनी कल्याणच्या एका लॉटरी सेंटरमधून महाराष्ट्र राज्य लॉटरीचे शंभर रुपये किमतीचे गुढीपाडवा सोडतीचे एक तिकीट खरेदी केले. २० मार्चच्या सोडतीत ते विजेते ठरले. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई येथील लॉटरी विभागाचे कार्यालय गाठले. मात्र, तुमचे तिकीट लागलेले नाही. अन्य दोन जणही तिकिटाची रक्कम घेण्यासाठी येऊन गेले असल्याचे उत्तर त्यांना तेथे मिळाले. तसेच, त्यांना कल्याण येथील लॉटरी सेंटरवर जाण्यास सांगितले. मात्र, तेथेही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे चक्रावून गेलेल्या कदम यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी लॉटरीविक्रेता आणि अन्य विजेत्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *