गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सोमवारी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताला महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र त्यांनी ठिकाणाचं नाव सांगण्यास नकार दिला आहे. ‘आम्हाला कोणतीही माहिती जाहीर करण्याआधी त्याची चौकशी करणं गरजेचं आहे’, असं विशेष तपास पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
ज्या संशियाताला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याच्याबद्दल विशेष तपास पथकाच्या सुत्रांकडून काही माहिती मिळाली आहे. ‘आमच्या एका टीमने मराठी भाषिक व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याचं वय ३० च्या आसपास आहे. त्याची उंची ५ फूट १ इंच आहे. वजन जवळपास ७५ ते ८० किलो आहे. त्याच्याजवळ कोणतंही शस्त्र किंवा हत्यार सापडलेलं नाही’, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
फॉरेन्सिकने सीसीटीव्हीचा अभ्यास केला असून गौरी लंकेश यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या झाली तेव्हा दुचाकीवर असलेल्या व्यक्तीची उंची ५ फूट १ किंवा २ इंच आणि वजन ७० ते ८० किलो असल्याचा निष्कर्ष काढला होता.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘हिंदू युवा सेने’चा कार्यकर्ता नवीन कुमार याचा मित्र अनिल कुमार याच्या मदतीने काही स्केचेस तयार करण्यात आले आहेत. नवीन कुमार याला गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी मदत पुरवल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकाने अनिल कुमार याला न्यायालयात हजर करत त्याचा जबाब नोंदवला होता. याचा अर्थ त्याचा जबाब पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.
विशेष तपास पथकाने चार्जशीटमध्ये नवीन याने गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी प्रवीण उर्फ सुजित कुमारसोबत मिळून कट रचल्याचं मान्य केल्याचं म्हटलं आहे.
