गेल्या दोन महिन्यांपासून ४० रुपये किलोवरून ३० रुपये किलो झालेले साखरेचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात साखर पुन्हा ३५ रुपये किलो झाली आहे. रमजान महिन्याबरोबरच पावसाळाही सुरू झाल्यामुळे साखरेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अर्थातच साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे.
या वर्षी साखरेचे दुप्पट उत्पादन झाले आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील अन्य राज्यांतही साखरेचे उत्पादन अधिक आहे. त्यामुळे गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर पडून आहे. असे असतानाच पाकिस्तानातूनही काही ठिकाणी साखर आयात करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याकडे साखरेचा साठा अधिकच वाढला होता. त्यामुळे साखरेचे दर कमी कमी होत गेले होते. अगदी ४० ते ४२ रुपये किलोपर्यंत गेलेली साखर आतापर्यंत ३० रुपये किलो दराने किरकोळ बाजारात मिळत होती. मात्र या आठवड्यापासून साखरेचे दर वाढण्यास सुरुवात झाली असून साखर आता ३५ किलोपर्यंत झाली आहे, अशी माहिती व्यापारी हर्षद देढीया यांनी दिली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे साखरेची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. येत्या सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचे दर आणखी काही रुपयांनी वाढण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
