मर्यादेपेक्षा अधिक सामानवहनाला रेल्वेचा सहापट दंड

नियमांची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या तक्रारींवरून कारवाई

हवाई प्रवासाप्रमाणेच आता रेल्वेतून जास्त सामान नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. रेल्वेतून मान्यतेपेक्षा अधिक सामान नेल्यास प्रवाशांना सहा पट दंड भरावा लागणार आहे.

रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रवासी जास्त सामान नेत असल्याच्या तक्रारींची रेल्वे प्रशासनाने दखल घेत तीन दशकांहून अधिक जुन्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. मान्यतेपेक्षा अधिक सामान नेताना प्रवाशाला पकडल्यास त्याला सहा पट दंड भरावा लागणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमानतळावर ज्या पद्धतीने प्रत्येक प्रवाशाच्या सामानाचे वजन करण्यात येते त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनही प्रवाशांच्या सामानाचे वजन करणार आहे. जवळपास तीन दशकांहून अधिक काळापासून नियम प्रचलित आहेत, मात्र आता ते काटेकोरपणे पाळण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि डब्यामध्ये होणाऱ्या गैरसोयीवर तोडगा काढण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असल्याचे रेल्वे मंडळाचे माहिती संचालक वेद प्रकाश यांनी सांगितले.

प्रवाशांना सामानाच्या डब्यातून जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत अतिरिक्त सामान नेण्याची मुभा आहे आणि त्यासाठी सामानाच्या दीडपट शुल्क भरावे लागणार आहे. मोफत सामान नेण्याची अनुमती असलेल्या सामानापेक्षा एखाद्या प्रवाशाकडे जास्त सामान आढळले तर सामानाच्या दराच्या सहा पट दंड त्याला भरावा लागणार आहे.

नियम काय?

प्रचलित निकषांनुसार स्लीपर आणि दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अतिरिक्त रक्कम न देता अनुक्रमे किमान ४० किलो आणि ३५ किलो आणि अतिरिक्त पैसे भरून जास्तीत जास्त ८० आणि ७० किलो सामान नेण्याची अनुमती आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त सामान हे सामानाच्या डब्यात ठेवले पाहिजे असा नियम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *