शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी राज्यात शेतकरी संप सुरू आहे. ५ जूननंतर हा संप आणखी तीव्र केला जाणार आहे. ६ व ७ जूनला शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भाजीपाला पाठविणार नाही. त्यामुळे राज्यात बाजार समित्या बंदच ठेवल्या जाणार असल्याची माहिती किसान क्रांती जनआंदोलनाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी रविवारी दिली. त्यामुळे या संपाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.
किसान क्रांती जनआंदोलनासाठी कोअर कमिटी असून, या कोअर कमिटीचे सदस्य अॅड. कमला सावंत, विजय काकडे यांनी नगरला रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ‘किसान क्रांती जनआंदोलन आता केवळ महाराष्ट्रात होत नाही. मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाबसह बावीस राज्यांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याने आता हे आंदोलन देशभर झाले आहे. सुरुवातीला महाराष्ट्र वगळता इतर राज्यात संप तीव्र झालेला आहे. महाराष्ट्रात ५ जूनपासून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मागील तीन दिवस संप तीव्र करण्यात आलेला नव्हता. शेतकऱ्य़ांना विश्वासात घेऊन ही रणनीती आखण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारला सकारत्मक विचार करावा लागणार आहे’, असे अॅड. सावंत यांनी जाहीर केले. ‘६ व ७ जून बाजार समित्या बंद ठेवण्यात येतील. १० जूनला भारत बंद आंदोलन केले जाईल. त्यानंतर सरकारने दखल न घेतल्यास कोअर कमिटी बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवेल’, असे सावंत यांनी स्पष्ट केले. तर मागील वर्षाच्या संपावेळी सरकारने दिलेले आश्वासन पाळले गेलेले नाही. दुधाला २७ रुपये भाव देण्याचे जाहीर केले. परंतु, प्रत्यक्षात आज १६ रुपयांपर्यंत लिटरला दर दिला जातो. ही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप कोअर कमिटीचे सदस्या सावंत यांनी केला. सरकारने केलेला हा विश्वासघात आहे. केंद्र सरकारमधील कृषिमंत्री यांनी आंदोलनाला चमकोगिरी म्हणून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेल्या केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे वाईट दिवस दिसत नाहीत, हे यावरून स्पष्ट होत आहे.
