राहुल गांधी म्हणजे निपाह व्हायरस!

केरळमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेल्या ‘निपाह’ व्हायरसची तुलना हरयाणाच्या एका मंत्र्यांने राहुल गांधी यांच्याशी केली आहे. राहुल गांधी म्हणजे निपाह व्हायरस आहे. त्यांच्या संपर्कात आलेला कोणताही राजकीय पक्ष तग धरणार नाही आणि संपून जाईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, विज यांच्या विधानावर आतापर्यंत काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

गेल्याच आठवडय़ात कर्नाटकमध्ये संयुक्त जनता दल आणि काँग्रेसने आघाडी स्थापन करून सत्ता राखली आहे. त्या पार्श्वभूमीवर विज यांनी हे वादग्रस्त विधान केल्याचे बोलले जात आहे. केरळमध्ये गेल्या आठवडय़ापासून धुमाकूळ घालत असलेल्या ‘निपाह’ व्हायरसने आतापर्यंत १४ जणांचा बळी गेला आहे. कोझिकोड येथे आढळलेल्या व्हायरसमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. संसर्गजन्य वटवाघळांनी खालेल्या फळांपासून हा व्हायरस परसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विज यांची वादग्रस्त विधाने
या आधीही विज यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. नमाज अदा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांचा कधी कधी उपयोग करणे ठीक आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणांचा ताबा घेण्यासाठी नमाज अदा करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी केलेले ट्विट चांगलेच गाजले होते. ‘१०० कुत्रे मिळून एका वाघाचा सामना केला जाऊ शकत नाही. शेवटी भाजपच निवडणूक जिंकेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *