मामाच्या गावाला नव्हे, उन्हाळी सुट्टी शिबिराला जाऊ या..

गावात शाळांना सुट्टी लागली की, मुलं मामाच्या गावाला जातात. मामाच्या गावातीलच छोटय़ाशा विहिरीत नाही तर बाजूच्या नदीत पोहण्याचा आणि शेतांमध्ये फिरण्याचा आनंद लुटतात. परंतु बहुतेक गावांना नागरीकरणाचा स्पर्श झाला आणि उन्हाळी सुट्टींची नवी प्रथा सुरू झाली. मामाचा गाव गेल्या काही वर्षांपासून मागे पडल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थीही ‘समर कॅम्प’च्या शोधात आहेत. त्यांचा हा शोध रायगड जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या उन्हाळी सुट्टी शिबिरांमध्ये येऊन थांबला. उन्हाळी सुट्टीत ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शिबिरांमध्ये बागडता यावे, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक संकल्पना आखली आणि परिषदेच्या दोन हजार ७०० शाळांमधील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेतला. त्यामुळे यंदाची सुट्टी मुलांसाठी धम्माल मस्तीची ठरली.

शहरांत विविध संस्थांच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात. त्यासाठी पालकांकडून मोठे शुल्कही आकारले जाते. मात्र ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना उन्हाळी सुट्टींची संकल्पना परवडणारी नसते. यासाठी जिल्हा परिषदेने या शिबिराचे आयोजन केले.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले. २३ एप्रिल ते ४ मे या कालावधीत उन्हाळी शिबिरे शाळेत पार पडली. ग्रामीण भागातील मुलांना पोहणे, घोडे सवारी, नाचणे, गाणे या गोष्टी अवगत असतातच त्यामुळे उन्हाळी शिबिरामधील मुलांना नेमके काय शिकविले पाहिजे, यावर विचारविनिमय करून. चित्रकला, रांगोळी, मनोरंजनात्मक पारंपरिक खेळ, नाटय़ीकरण, गोष्टी, गाणी, कथा, कविता, बडबड गीते, मातीकाम यासह इंग्रजी संभाषण, पारंपरिक वेशभूषा, मैदानी खेळ, व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे बाबींचे ज्ञान, सामान्य ज्ञान, मुखवटे आणि शेवटच्या दिवशी ‘मला काय व्हायचे’ याबाबत माजी मान्यवर विद्यार्थ्यांनी मुलांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *