राष्ट्रपती भवनचं एका महिन्याचं फोन बिल तब्बल 5 लाख रुपये!

राष्ट्रपती भवनचं एका महिन्याचं फोन बिल तब्बल 5 लाख रुपये!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या वीजबिलावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता राष्ट्रपती भवनाच्या फोन बिलावरुन वाद होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रपती भवनाचं फोन बिल तब्बल 5 लाख रुपये आलं आहे.

मुंबईत राहणारे मन्सूर दरवेश यांनी मागील महिन्यात माहिती अधिकार अंतर्गत राष्ट्रपती भवनाच्या व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चाबाबत माहिती मिळवली आणि त्यातील आकडे हे धक्कादायक होते.

राष्ट्रपतींच्या सचिवालयावर होणारा खर्च, स्टाफ, दैनंदिन खर्च आणि राष्ट्रपतींना मिळणारा अलाऊन्स 2012-13 मध्ये 30.96 कोटी, 2013-14 मधील खर्च 38.70 कोटी होता. तर 2014-15 मध्ये हा खर्च 41.96 कोटींपर्यंत पोहोचला, असं या माहितीमध्ये स्पष्ट झालं आहे.

आरटीआयमध्ये राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही विचारण्यात आली होती. यावर उत्तर मिळालं की राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयात 754 कर्मचारी, 9 खाजगी सचिव, 27 चालक, 64 सफाई कर्मचारी आणि 8 टेलिफोन ऑपरेटर काम करतात.

मे महिन्यात या कर्मचाऱ्यांच्या पगारावर 1.52 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मे महिन्यात टेलिफोनचं बिल तब्बल 5.06 लाख रुपये आलं होतं, तर मार्चमध्ये 4.25 लाख आणि एप्रिलमध्ये 5.06 लाख रुपये आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *