प्रसिद्ध स्वीडिश डीजे एविचीचे ओमानची राजधानी मस्कतमध्ये निधन झाले आहे. एविचीने वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. एविचीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. एविचीच्या अकाली निधनाच्या बातमीने त्याचे कुटुंब कोलमडून गेले असून या कठिण काळात चाहत्यांनी आणि सर्वांनीच एविचीच्या कुटुंबियांच्या खासगी आयुष्याचा सन्मान केला पाहिजे असे प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटले आहे.
डीजे आणि रेकॉर्ड प्रोड्यूसर असलेल्या एविचीला लोक त्याच्या इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखतात. एविचीचे मूळ नाव टिम बर्जलिंग होते. जगातल्या वेगवेगळया देशांमध्ये एविचीने कार्यक्रम केले होते. त्यामुळे जगभरात त्याचा चाहता वर्ग आहे. एविचीला दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाला आहे. ‘वेक मी अप’, ‘द डेज’ आणि ‘यू मेक मी’ ही एविचीची गाणी बरीच गाजली.
एविचीचे ‘वेक मी अप’ हे गाणे २०१३ साली ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. २०१३ साली आलेल्या True या डेब्यु अल्बमपासूनच एविचीने स्वत:हाची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा एक चाहतावर्ग तयार झाला होता. निधनाच्या काही दिवस आधीच एविचीला टॉप डान्स आणि इलेक्ट्रॉनिक अल्बमसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.