मोबाइलद्वारे टोल भरता येणार

राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर असून, यापुढे त्यांना टोल  भरण्यासाठी रखडण्याची आवश्यकता भासणार नाही. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठी लवकरच न थांबता टोल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे टोल भरण्यासाठी लागणारा वेळ वाचण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांतच मोबाइलवरून टोल भरण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. मोबाइलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोठेही थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.

पाच महामार्गांची निवड

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रयोगासाठी पाच राष्ट्रीय महामार्गांची निवड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामध्ये दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते चंडीगड, दिल्ली ते कोलकाता आणि बेंगळुरू ते चेन्नई आदींचा समावेश आहे. येत्या काही महिन्यांत प्रायोगिक तत्त्वावर याची चाचपणी होणार आहे. ‘एनएचएआय’तर्फे लवकरच एक मोबाइल अॅप सादर करण्यात येणार असून, त्यामध्ये टोल भरण्यासाठीच्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *