अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील दादरमध्ये घडली आहे. दिनेश सांगळे असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
दिनेश सांगळे काल दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर झाड कोसळलं.
या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दिनेश सांगळे हे दुपारच्या जेवणासाठी आले होते. ते फुटपाथवरुन चालत असताना, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालाय परिसरात, त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.
दिनेश सांगळे हे नायगाव कामगार वसाहतीत रहात होते.
काही दिवसांपूर्वीच चेंबूरमध्येही अशाच घटना घडल्या होत्या.
जुलै 2017 मध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या अंगावर झाड पडून, तिचा मृत्यू झाला होता. चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन रघुनाथ या महिलेचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये बस स्टॉपवर बसची वाट पाहत बसलेल्या शारदा सहदेव घोडेस्वार (45) यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता.
झाड पडून मृत्यू झालेल्या घटना
- 22 जुलै 2017 – दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू
- 23 जुलै 2017 – किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू
- 7 डिसेंबर 2017 – शारदा घोडेस्वार – डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू
- 19 एप्रिल 2018 – दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू