ठाणे-बेलापूर या नवी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गावरील घणसोली आणि सविता केमिकल कंपनीसमोरील उड्डाणपुलाचे आणि महापे येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून या मे महिन्याअखेर ते पूर्ण करण्याची ग्वाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होऊन येथील वाहतूककोंडी फुटण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हे तीनही प्रकल्प पूर्ण झाल्यावर दिघा ते बेलापूर हा एक तासाचा प्रवास अंदाजे २० ते २५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार संदीप नाईक यांनी या प्रकल्पांच्या कामांचा पाहणीदौरा केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
ठाणे-बेलापूर मार्गावर सविता केमिकल कंपनी, नोसिल नाका आणि लोकमत सर्कल या ठिकाणांवर सर्वात जास्त वाहतूककोंडी होते. नवी मुंबई पालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतूककोंडी हटविण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे-बेलापूर मार्गावर १५५ कोटी रुपये खर्चाचे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावेत, यासाठी आमदार संदीप नाईक यांनी सरकारस्तरावर पत्रव्यवहार, पाठपुरावा केला आहे. आता या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर लोकमत सर्कलवरील वाहतूककोंडी फुटणार आहे. या ठिकाणी एक सिग्नल बसणार असून ठाण्याकडून पुढे कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणारी वाहने आणि ठाणे तसेच बेलापूरकडून येणारी-जाणारी वाहने येथून सुरळीतपणे जाऊ शकणार आहेत. नोसिल नाका येथे दीड किलोमीटरचा उड्डाणपूल असल्याने येथील वाहनेदेखील जलदगतीने रबाळेपासून पुढचा प्रवास करू शकतील. या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांमुळे घणसोली, नोसिल नाका आणि सविता केमिकल कंपनी या ठाणे-बेलापूर मार्गावरील सर्वात जास्त वाहतूककोंडीच्या ठिकाणांवरील ताण कमी होणार आहे.
