५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
बागपत येथे बुधवारी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मृतकाचेच मित्र असल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक माहिती समोर

या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मित्रांनीच मिळून आपला मित्र अंकित याची हत्या केली. अंकितने एक अंड जास्त खाल्याने या मित्रांनी त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तलावात आढळला मृतदेह

अंकितने एक अंड जास्त खाल्याने संतापलेल्या इतर चौघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या अंगावर तब्बल १५ वार केले. अंकितचा मृतदेह जवळच असलेल्या तलावात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत अंकितच्या चार मित्रांना अटक केली आणि त्यावेळी समोर आली धक्कादायक माहिती.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

सर्व आरोपी हे अंकितचे मित्र आहेत आणि ते ट्योढी गावात राहतात. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल करताना सांगितलं की, अंकिंत शर्मासोबत बसून सर्वजण दारु पित होते. त्यावेळी या तरुणांनी अंडी मागवली होती. मात्र, याच दरम्यान अंकितने एक अंड जास्त खाल्लं त्यामुळे विकास नावाच्या तरुणाला अंड मिळालं नाही. यानंतर विकास, मन्नू आणि अंकित यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी अंकितची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *