चारा घोटाळा: लालूप्रसाद यादव यांना ७ वर्षांची शिक्षा, ३० लाखांचा दंड

चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर ३० लाख रूपयांचा दंड ही ठोठावला आहे. दुमका कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालू्ंना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते. याच खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.

चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणात (चाईबासा कोषागार) लालूप्रसाद आणि जगन्नाथ मिश्रा यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने लालूप्रसाद यांना १० लाख तर जगन्नाथ मिश्रा यांना ५ लाखांचा दंड ठोठावला होता.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देवघर कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालूप्रसाद यांच्याकडून झारखंड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. या शिक्षेनंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्याचा पर्याय दिला होता. त्या आधारावर लालूंनी झारखंड उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *