महाबळेश्वरमध्ये हिमकणांचे पर्यटन
वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांमध्ये ऋतुचकव्याची अनुभूती अवकाळी पाऊस, थंडीत उन्हताप आणि उन्हाळ्यात गारठय़ाच्या रूपात सातत्याने पाहायला मिळत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांचे लाडके स्थान असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात भलताच सृष्टीबदल पाहण्यास मिळाला आहे. तापमानात अचानक प्रमाणाहून अधिक घट झाल्याने गुरुवारी रात्री वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले. एरव्ही डिसेंबर-जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत होणाऱ्या हिमकणांच्या सडय़ाचे मार्च महिन्यातील रखरखाटात झालेल्या अनपेक्षित पर्यटनाला अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. स्थानिक वातावरणीय परिस्थितीमध्ये तफावत झाल्यामुळे तापमान इतके खाली घसरले असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.
वृक्षतोड आणि इतर अनेक कारणांमुळे झालेल्या पर्यावरणीय हानीमुळे तापमान विरोधाभास तयार होत आहे. त्यावर सामूहिकरीत्या वृक्षारोपण करणे हा पर्याय आहे असे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रकाश सावंत यांनी सांगितले. किमान ३३ टक्के वन असावे अशी अपेक्षा परिसर अभ्यासाच्या शालेय पुस्तकांतून नोंदवली जात असताना अनेक ठिकाणी ते प्रमाण पाच ते सहा टक्क्यांवर खाली येणे गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी असाच गारांचा पाऊस वेण्णा लेक परिसरात पडल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
महाबळेश्वरमधील तापमान अचानक कमी झाल्याचा अनुभव स्थानिकांनी व्यक्त केला. स्ट्रॉबेरी उत्पादक तानाजी भिलारे यांनीही उन्हाळ्यात हा प्रकार प्रथमच पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. तापमान बदलामुळे मोठय़ा प्रमाणात हवेत गारवा निर्माण झाला असा अनुभव महाबळेश्वर येथील व्यावसायिक ओंकार दीक्षित यांनी सांगितला. अर्थात त्यामुळे या आठवडय़ाच्या शेवटी मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
झाले काय?
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात विरोधाभासी बदल जाणवत आहेत. गेल्या आठवडय़ात राज्यातील अनेक भागांत पाऊस पडला तर गुरुवार-शुक्रवारी मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाळी वातावरण होते. या सगळ्या स्थितीत महाबळेश्वरमध्ये तापमान अचानक चार ते पाच अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले. ते पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली.
कारण काय?
आजूबाजूच्या दऱ्या-खोऱ्यातून वाऱ्याची झुळूक आल्याने त्याचा परिणाम बाष्पावर होतो त्यामुळे हे हिमकण तयार होतात, स्थानिक पातळीवर वातावरणात असे बदल दिसतात. मात्र ते लगेच टिपणे शक्य होत नाही. मात्र वातावरणातील हे झपाटय़ाने होणारे बदल आपण वनसंपदा कमी करत असल्याने होत असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रकाश सावंत यांनी व्यक्त केले.
