विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाहीये. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेची सध्याची वाहतूक ही कुर्ल्यापर्यंतच सुरू ठेवण्यात आली आहे. कुर्ल्याहूनच ठाणे, कर्जत, कसारा लोकल सोडल्या जात आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना कुर्ल्यातच उतरावं लागतंय. त्यातच ओला आणि उबेरने संप पुकारल्यानं प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नाहीये. सीएसएमटीच्या दिशेने जाणारे हे प्रवासी एका पर्यायी मार्गाचा अवलंब करू शकतात. मध्य रेल्वेवरील प्रवासी घाटकोपरला उतरून मेट्रोने अंधेरीनं पश्चिम मार्गावर जाऊ शकतात. त्या मार्गे ते चर्चगेटला पोहोचू शकतात.
चर्चगेटमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमचे ऑफिस गाठता येईल. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट प्रशासनही पुढे सरसावलं आहे. बेस्ट प्रशासनाने कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंडमधून ज्यादा बसेस सोडण्याचा आदेश जारी केला आहे. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो निष्फळ ठरला आहे. आता या आंदोलनात मनसेनंही उडी घेतली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.