डोक्यात बॅट घालून पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेंची हत्या

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या डोक्यात बॅट घालून करण्यात आली ही माहिती आता समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरनेच अश्विनी बिद्रेंच्या डोक्यात घालून त्यांना ठार केले अशी कबुली याच प्रकरणातला आरोपी महेश फळणीकरने दिली आहे. महेश फळणीकर हा अभय कुरुंदकरचा खास मित्र आहे. त्याने या हत्याकांडात अभय कुरुंदकरांची साथ दिली असून पोलीस चौकशीत त्याने ही कबुली दिली.

अश्विनी बिद्रे यांचे हत्या प्रकरण पोलीस अधिकारी दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. तसेच अभय कुरुंदकरने फॉरेन्सिक अहवालात फेरफार केले असावेत असाही आरोप गोरे यांनी केला.

नवी मुंबई पोलिसांनी आरोपी महेश फळणीकरला अटक केल्यानंतर त्याने बिद्रे यांची हत्या करुन, मृतदेहाचे तुकडे करुन, मृतदेह कुरंदकरांनी आपल्या फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी हा मृतदेह वसई येथील भाईंदरच्या खाडीत टाकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.

नेमके प्रकरण काय?
एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या होत्या. मात्र त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी केला.

अश्विनी बिद्रे या मूळच्या कोल्हापूर येथील आळते गावातील होत्या. २००५ मध्ये त्यांचा विवाह हातकणंगले येथील राजू गोरे यांच्याशी झाला होता.

लग्न झाल्यानंतर वर्षभरात त्या स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उप निरीक्षक पद मिळाले.

पद मिळाल्यावर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगलीत झाली. त्याचवेळी अश्विनी यांची ओळख वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती.

२०१३ मध्ये अश्विनी बिद्रेंना बढती मिळाली त्या रत्नागिरीला रुजू झाल्या.

रत्नागिरीतही अभय कुरुंदकर त्यांना भेटण्यासाठी जात होता. या दोघांमध्ये जेव्हा वाद होऊ लागले तेव्हा कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रेंना गायब करेन अशा धमक्या वारंवार दिल्या होत्या.

२०१५ मध्ये अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोलीत झाली. मात्र त्या पोलीस ठाण्यात हजर झाल्याच नाहीत. त्यानंतर त्या गायब झाल्याचे बिद्रे आणि गोरे कुटुंबाला समजले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *